‘त्या’ दुधात किती पाणी आहे, हे मला माहीत आहे – सदाभाऊ खोत

60

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी नाही. तर निवडणुकांसाठी आहे. रस्त्यावर ओतल्या जाणाऱ्या दुधात किती पाणी आहे, हे मला चांगले माहीत आहे,’ अशा शब्दांत कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांची खिल्ली उडवली.  खोत  एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात आज (सोमवार) सकाळपासून दूध आंदोलन सुरू करण्यात आले आहे. गाड्या अडवून दूध रस्त्यावर ओतले जात आहे. या आंदोलनावरून राज्य सरकार व आंदोलकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. निमंत्रण देऊनही शेट्टी चर्चेला येत नाहीत, असे सरकारने म्हटले आहे. तर, सरकारकडून चर्चेसाठी बोलावणे आलेले नाही, असे शेट्टी यांनी म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांच्या हेतूवरच प्रश्न उपस्थित केला आहे. या आंदोलनाचा शेतकऱ्यांच्या हिताशी काडीचाही संबंध नाही. स्वत:ला नेता म्हणून पुढे आणण्यासाठी हा खटाटोप  सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी चर्चेची तयारी दाखवूनही ते चर्चेला येत नाही. प्रश्न सोडविण्याची त्यांची इच्छाच दिसत नाही,’ असे खोत यांनी म्हटले आहे.