त्यावेळी माझे ऐकले असते, तर दाभोलकर, पानसरे, यांच्या हत्या झाल्या नसत्या – छगन भुजबळ

884

मनमाड, दि. २३ (पीसीबी) – सनातन सारख्या संस्थांवर वेळीच  कारवाई करून  २००५ मध्येच या संस्थांवर बंदी घालण्याची सुचना केली होती. त्यावेळी  माझे ऐकले असते तर, डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश आणि कुलबर्गी यांच्या हत्या झाल्या नसत्या, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  छगन भुजबळ यांनी आज (गुरूवार) येथे केला.

फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा आणि माणसे संपविण्याचे षडयंत्र सध्या सनातन संस्थेकडून सुरू  असल्याचे सिद्ध  होत आहे. त्यामुळे सनातन संस्थेवर सरकारने तातडीने कारवाई करून  बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली.

सध्या देशात दलित, हिंदू, मुस्लिम असा नवा वाद निर्माण करण्यात येत आहे. त्यावरुन लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.  येत्या  काळात पुन्हा तुम्हाला मोठमोठी स्वप्ने दाखविण्याचे उद्योग केले जातील. मात्र, यावेळी भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहनही भुजबळ यांनी केले.