‘तो’ पुन्हा आला! चीनमध्ये कोरोना संसर्गाला पुन्हा सुरुवात; विमानसेवा,शाळा तात्काळ बंद

206

बीजिंग, दि.२२ (पीसीबी) : संपूर्ण जगाला कोरोना विषाणू संसर्गाच्या घाईत लोटणाऱ्या चीनमध्ये नव्यानं कोरोना विषाणू संसर्गाला सुरुवात झालीय. चीनमधील शेकडो विमान फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. शाळा देखील बंद करण्यात आल्या असून कोरोना चाचण्यांचा वेग वाढवण्यात आलाय. देशाच्या विविध भागात प्रवास करणाऱ्या वृद्ध प्रवाशांमध्ये कोरोनाचा नवा संसर्ग आढळून आलाय. चीनच्या प्रशासनानं देशांतर्गत प्रांतांच्या सीमा बंद केल्या असून काही ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलंय.

चीनमध्ये नव्या कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावाचा अंदाज घेतला असता सलग पाच दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाचे नवे रुग्ण उत्तर आणि वायव्य प्रांतात आढळून आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नवे कोरोना रुग्ण हे वयस्कर जोडप्यांशी संबंधित आहे. शांघाय, झियान गन्सू आणि मंगोलिया प्रांतात त्या जोडप्यानं प्रवास केल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्यांनाही संसर्गा झाल्याचं समोर आलं असून चीनची राजधानी बीजिंगमध्येही काही रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या नव्या लाटेमुळं स्थानिक प्रशासनानं कोरोना चाचण्याची संख्या वाढवली आहे. मोठ्या प्रमाणावर चाचण्या करण्यात येत आहेत. पर्यटन स्थळ, शाळा, मनोरंजन पार्क्सच्या ठिकाणी कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. चीनमधी उत्तरेतील लांझोऊ शहरातील 40 लाख नागरिकांना आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात आलंय. ज्यांना घराबाहेर पडायचंय त्यांनी कोरोना चाचणी करुन अहवाल निगेटिव्ह आल्याशिवाय बाहेर पडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाचं संकट वाढलेल्या प्रांतामधील शेकडो विमानांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. झियान आणि लांझोऊ प्रांतातील 60 टक्के फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. इरेनहोत आणि इनर मंगोलिया या दोन्ही शहरांतर्गत वाहतूक रद्द करण्यात आली आहे. नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. इनर मंगोलियातील कोरोनाच्या नव्या विस्फोटामुळं कोळसा आयातीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

WhatsAppShare