‘तो’ दाढिवाला कोण ?

53

मुंबई, दि. २९ (पीसीबी) : कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीत एक आंतरराष्ट्रीय माफिया त्याच्या मैत्रिणीसोबत सहभागी झाला होता. हा दाढीवाला माफिया समीर वानखेडे यांचा मित्र आहे. सीसीटीव्ही फूटेज जाहीर झाल्यास ते सहज समोर येईल. आज तो दाढीवाला मोकाट आहे आणि काही लोकांना प्रसिद्धीसाठी विनाकारण अडकवण्यात आलं आहे,’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. ‘एनसीबीनं या दाढीवाल्याला शोधून काढावं, अन्यथा आम्ही हे सगळं जाहीर करू,’ असा इशारा मलिक यांनी दिला आहे.

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी आज क्रूझवरील ड्रग पार्टी संदर्भात आणखी काही गौप्यस्फोट केले. ‘क्रूझवर ड्रग पार्टी बनावट नव्हती. ही पार्टी झाली होती. तिथं अनेक लोक उपस्थित होते. त्यांनी मौजमजा केली. मात्र, ही पार्टी काही लोकांना टार्गेट करण्यासाठी ठरवून आयोजित करण्यात आली होती. त्या पार्टीमागे एक आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया होता. तो स्वत:ही या मैत्रिणीच्या सोबत पार्टीत सहभागी झाला होता. तिथं नाचत होता. त्याची मैत्रीण बंदूक घेऊन क्रूझवरील पार्टीत नाचताना दिसतोय. असं सगळं असूनही एनसीबीनं केलेल्या कारवाईतून तो अलगद निसटला. आजही तो मोकाट फिरतो आहे. कारण तो समीर वानखेडे यांचा मित्र आहे. गोव्यातील ड्रग टूरिझमचा तो सूत्रधार आहे. तो तिहार आणि राजस्थानच्या तुरुंगात होता अशीही माहिती आहे,’ असा दावा नवाब मलिक यांनी केला. गोवा राज्यातील सर्व ड्रग्ज चा व्यापार हा दाढिवालाच पाहतो, असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

‘क्रूझवरील ड्रग पार्टीचे सीसीटीव्ही फूटेज एनसीबीनं जाहीर करायला हवेत. त्यातून सगळं काही समोर येईल. समीर वानखेडे यांची चौकशी करण्यासाठी एनसीबीचं जे दक्षता पथक आलंय, त्यांनी या सगळ्याची चौकशी करावी. वाटल्यास एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी माझ्याशी संपर्क साधावा. मात्र, एनसीबी ही चौकशी करणार नसेल आणि त्या दाढीवाल्या ड्रग माफियाला उजेडात आणणार नसेल तर आम्ही आम्ही सगळं उघड करू, असा इशारा मलिक यांनी दिला आहे.

WhatsAppShare