“…तोपर्यंत मोदींना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही”

339

लातूर, दि. २७ (पीसीबी) – मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर होईपर्यंत पंतप्रधान नरेंद मोदी यांना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा आज अखिल भारतीय छावा संघटनेने दिला. आज लातूर इथे झालेल्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या नानासाहेब जावळे यांनी हा इशारा दिला.

आमदार-खासदारांनी राजीनाम्याचे स्टंट करु नयेत, त्यांनी सभागृहात आरक्षणाचा मुद्दा मांडण्याची गरज आहे, असे जावळे म्हणाले. तसेच, आरक्षणाची एवढीच काळजी असेल तर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर उपोषण करावे, असेही ते म्हणाले.

सरकार चर्चेला तयार आहे, ही संकल्पनाच आम्हाला मान्य नाही, चर्चा वैगरे काही नको, आगोदर आरक्षणाचा निर्णय घ्या आणि नंतर चर्चा करा, अशी भूमिका छावाने घेतली आहे. याशिवाय शरद पवारांनी आरक्षणाबाबत ठोस भूमिका घ्यावी, वेळोवेळी भूमिका बदलू नये, असे नानासाहेब जावळे म्हणाले.

गेल्या काही दिवासांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक झाला आहे. आधी ‘मूक मोर्चे’ काढणाऱ्या मराठा समाजाने आता ‘ठोक मोर्चे’ काढण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र बंद, मुंबई बंदही करण्यात आले. या सर्व आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी तोडफोड, जाळपोळ अशी तीव्र आंदोलनंही झाली. त्यामुळे एकंदरीतच मराठा समाजाने आरक्षणाची मागणी जोराने लावून धरली आहे.