‘ते’ बेपत्ता विमान समुद्रात कोसळले

0

जकार्ता,दि.१०(पीसीबी) – इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून उड्डाण करणारे श्रीविजया एअरचे विमान समुद्रात कोसळल्याचे वृत्त आहे. इंडोनेशियाचे परिवहन मंत्री बुदी कारया यांनी या वृत्ताल दुजोरा दिला आहे. एसजे १८२ हे विमान जकार्ता विमानतळापासून २० किलोमीटरच्या अंतरावर अपघातग्रस्त झाल्याचे कारया यांनी माहिती देताना सांगितले. या विमानात १२ क्रू मेंबर्सव्यतिरिक्त ५० प्रवासी होते. हे विमान इंडोनेशियाच्या लाकी द्वीपाजवळ कोसळले.

इंडोनेशियाच्या सोशल मीडियावर या विमानाच्या छिन्नविछिन्न झालेल्या भागांचे फोटो व्हायरल होत होते. मात्र, तोपर्यंत हे विमान कोसळल्याचे अधिकृतपणे स्पष्ट झालेले नव्हते. या पूर्वी देखील सन २०१८ मध्ये इंडोनेशियाच्या लायन एअरचे विमान समुद्रात कोसळले होते. या दुर्घटनेत १८९ लोकांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान विमानाच्या रजिस्ट्रेशनच्या नंबरनुसार, हे विमान २६ वर्षे जुने बोइंग ७३७-५०० साखळीतील आहे. या विमानाने जकार्ताच्या सोकार्नो-हट्टा विमानतळावरून उड्डाण केले होते. उड्डाणानंतर ४ मिनिटांनंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलचा विमानाशी असलेला संपर्क तुटला होता. यानंतर लगेचच शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले होते.

WhatsAppShare