तेलंगणा विधानसभा मुदतीपूर्वीच बरखास्त  

230

हैदराबाद, दि. ६ (पीसीबी) – तेलंगणा विधानसभा मुदतीपूर्वीच बरखास्त करण्याचा निर्णय मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज (गुरूवार) घेतला.  तेलंगणात के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणा राष्ट्र समितीचे सरकार आहे. या सरकारचा कार्यकाळ २ जून २०१९ पर्यंत आहे. मात्र त्यापूर्वीच सरकार बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आज दुपारी साडेबाराच्या सुमारास झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभा बरखास्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. त्यामुळे तेलंगणात वेळेआधीच निवडणुका होण्याची शक्यता आहे. अधिक माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव पत्रकार परिषद घेणार आहेत.

दरम्यान, तेलंगणात सहा महिन्यांच्या आत विधानसभा निवडणुका घ्याव्या लागतील. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ २ जून २०१९ पर्यंत होता. त्यामुळे तिथे लोकसभा निवडणुकीवेळीच विधानसभेच्या निवडणुका झाल्या असत्या. मात्र, चंद्रशेखर राव यांनी त्यापूर्वीच म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानसोबत तेलंगणाच्या निवडणुका व्हाव्यात, अशी मागणी केली आहे. त्यासाठीच विद्यमान विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.