तेलंगणातील भीषण बस अपघातात ३२ प्रवासी ठार

252

जगतियाल, दि. ११ (पीसीबी) – तेलंगणा राज्यातील जगतियाल जिल्ह्यातील कोंडागट्टू घाटात राज्य परिवहन निगमची बस उलटल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये ३२ प्रवासी ठार झाले आहेत, तर २८ जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावर पोलिस पोहोचले असून तेथे बचाव कार्य सुरू आहे. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघात झालेल्या बसमध्ये एकूण ६० प्रवासी प्रवास करत होते. त्यातील ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २८ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही बस शनिवारमपेठ येथून कोंडागट्टू मार्गे जगतियालला जात होती. उतरणीचा रस्ता होता आणि वळण घेताना बसचे ब्रेक फेल झाले आणि बस घाटात ३० फूट खाली जाऊन कोसळली.