‘तू रस्त्यावर बसून धंदा का करतोस’ असे म्हणत मारहाण

90

हिंजवडी, दि. २१ (पीसीबी) – रस्त्यावर बसून भाजीविक्री करत असल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका भाजीविक्रेत्याला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 18) रात्री कोलते-पाटील रोड हिंजवडी येथे घडली. योगेश वसंतराव पोकळे (वय 34, रा. कोलते पाटील टाउनशिप जवळ, हिंजवडी) असे मारहाण झालेल्या भाजीविक्रेत्याचे नाव आहे. त्यांनी याबाबत रविवारी (दि. 20) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजकुमार नागनाथ कोळी (वय 70, रा. जांबे, ता. मुळशी), अमरीश बाबू न्यावनुर (वय 33, रा. जांबे ता. मुळशी. मूळ रा. गुलबर्गा) आणि खान या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोकळे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी पोकळे कोलते पाटील रोड वरून पायी चालत जात होते. त्यावेळी आरोपी राजकुमार, त्याचा जावई अमरीश आणि अन्य दोघांनी फिर्यादी यांना अडवले. ‘तू रस्त्यावर बसून धंदा का करतोस’, या कारणावरून आरोपींनी फिर्यादीस यांना शिवीगाळ, दमदाटी करून लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare