‘तुला पाहते रे’ मालिकेवर बंदी घाला; पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
4302

पुणे, दि. २७ (पीसीबी) – ‘झी मराठी’ वाहिनीवरील अल्पावधीत लोकप्रिय झालेली ‘तुला पाहते रे’ या  मालिकेवर बंदी घालण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पुणे जिल्हाधिकारी राम किशोर नवल यांच्याकडे केली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘तुला पाहते रे’ ही मालिका बंद करावी, किंवा त्यामध्ये बदल करावेत. पुरोगामी महाराष्ट्रातील संस्कृतीविरोधात या मालिकेत विषय हाताळण्यात आला आहे. त्यामुळे महिला,तरूणी यांच्यापर्यंत चुकीचा संदेश जात आहे.

या मालिकेत कॉलेजमध्ये शिकणाऱ्या २० वर्षीय तरुणीचे ४० वर्षीय व्यक्तीसोबत प्रेमसंबंध दाखवले आहेत. हा संदेश जिजाऊंची शिकवण असलेल्या महाराष्ट्राला घातक आहे. या मालिकेतून आमच्या माता-भगिनींना वेगळा संदेश देण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे मालिका बंद तरी करावी किंवा त्यात बदल करावेत, अशी मागणी या निवेदनात केली आहे.

या मालिकेत सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची प्रमुख भूमिका आहे. सोशल मीडियावर काही दिवसांपासून मालिकेच्या विरोधात चर्चा सुरु होत्या. तरीही टीआरपीच्या स्पर्धेत या मालिकेचे अग्रस्थान कायम आहे.