‘तुला कसले पैसे द्यायचे; तू माझे काही करू शकत नाही’ असे म्हणत मारहाण केली

145

चाकण, दि. २८ (पीसीबी) – केलेल्या बांधकामाचे राहिलेले पैसे मागितल्याने बांधकाम ठेकेदाराला एकाने जातीवाचक शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. ही घटना सप्टेंबर 2020 पासून 16 जून 2021 पर्यंत मेदनकरवाडी येथे घडली. याबाबत मारहाणीसह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा (ॲट्रॉसिटी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नानासाहेब शिवराज गांदले (वय 32, रा. कडाचीवाडी, ता. खेड) यांनी याबाबत मंगळवारी (दि. 27) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जयराम नरसिंगराव सोळंके (वय 43, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नानासाहेब यांनी आरोपी जयराम याच्या घराचे बांधकाम केले होते. त्या बांधकामाचे 16 लाख 60 हजार रुपये आरोपी जयराम याच्याकडून फिर्यादी यांना येणे होते. त्यामुळे फिर्यादी यांनी ‘मला व्यापारी लोकांचे पैसे देणे आहे. ते सारखे पैसे मागत आहेत’, अशी विनंती करत आरोपीकडे पैसे मागितले. त्यावरून आरोपीने फिर्यादी यांना जातीवाचक शिव्या देऊन ‘तुला कसले पैसे द्यायचे. तू माझे काही करू शकत नाही’, असे म्हणून हाताने मारहाण केली. तसेच गाडीचा धक्का देऊन आरोपी पळून गेला. याबाबत ॲट्रॉसिटीचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare