तुम्हाला राज्य चालवायचे आहे, स्वयंपाक करायचा नाही- शरद पवार

342

बार्शी, दि. १२ (पीसीबी) – पुन्हा सरकार आल्यानंतर १० रुपयांत जेवण देण्याच्या शिवसेनेच्या घोषणेची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार खिल्ली उडवली आहे. ‘शिवसेनेची झुणका-भाकर योजना कधी बंद झाली ते कळलंही नाही आणि आता ते थाळी देणार आहेत. तुम्हाला राज्य चालवायचे आहे, स्वयंपाक करायचा नाही,’ असा सणसणीत टोला पवार यांनी शिवसेनेला हाणला आहे.

सोलापुरातील बार्शी इथं झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत शरद पवार बोलत होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज आपला वचननामा जाहीर केला आहे. त्यात महाराष्ट्रातील जनतेला १० रुपयांत भोजन देण्याचे प्रमुख वचन देण्यात आले आहे. हाच धागा पकडून पवार यांनी आपल्या खास शैलीत शिवसेनेवर हल्लाबोल केला. ‘युतीचे सरकार असताना शिवसेनेने १ रुपयांत झुणका-भाकर ही योजना सुरू केली होती. मात्र, ही योजना कधी बंद झाली ते कळलेही नाही,’ असे पवार म्हणाले.

भाजपाध्यक्ष अमित शहा हे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सभा घेत आहेत. प्रत्येक सभेत ते कलम ३७० च्या मुद्द्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करत आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही त्यांचीच री ओढत आहेत. कलम ३७० ला विरोध करणाऱ्या पक्षांना मतदान करणार का, असा प्रश्न मतदारांना विचारत आहेत. त्यावरूनही पवार यांनी सेना-भाजपचा समाचार घेतला. ‘कलम ३७० रद्द करण्याला आमचा पाठिंबाच आहे. मात्र, त्यांचा विनाकारण जप सुरू आहे. ३७० कलमावरून ओरडणारे ३७१ कलमावर गप्प का?,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

WhatsAppShare