तुम्हाला थप्पड मारली, तर माझाच हात मोडेल ; ममता बॅनर्जींचा मोदींना टोला  

119

कोलकता, दि. १२ (पीसीबी) – मोदी तुम्हाला लोकशाहीची थप्पड मारावीशी वाटते, असे वक्तव्य मी केले होते. मी तुम्हाला थप्पड मारेन,  असे कधीही बोलले नव्हते. मी तुम्हाला थप्पड कशाला मारू? तुम्हाला थप्पड मारली तर माझाच हात मोडेल. मग मी कशाला तुम्हाला थप्पड मारू? असा टोला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला.

तुम्ही ५६ इंच छातीचा दावा करणारे पंतप्रधान आहात. तुम्हाला थप्पड मारणे, तर सोडूनच द्या साधा स्पर्श करण्याचीही इच्छा नाही,  असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

तृणमूल काँग्रेसवर खंडणीचे पैसे वापरल्याचा  आरोप मोदींनी केला आहे. या आरोपावर त्यांना लोकशाहीची एक थप्पड मारावीशी वाटते,  असे बॅनर्जी यांनी म्हटले आहे. मोदी आणि अमित शहा हे दुर्योधन आणि दुःशासनासारखे आहेत. रावण आहेत असाही आरोप बॅनर्जी यांनी केला होता.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांना प्रत्युत्तर देताना ममतादीदींनी मला थप्पड मारली, तरी मी तो आशीर्वादच समजेन असे मोदी यांनी म्हटले होते.   चिटफंडच्या नावाखाली गोरगरीबांच्या कमाईवर डल्ला मारणाऱ्या घोटाळेबाजांनाही ममतादीदींनी अशीच थप्पड मारली असती, तर बरे झाले असते, असा टोला मोदींनी लगावला होता.