तुम्हालाही मुस्लीम बनवून दाढी ठेवायला लावू; ओवैसींची धमकी

976

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – मुस्लिमांना दाढी काढण्यास भाग पाडणाऱ्यांना आम्ही मुस्लीम बनवू आणि त्यांनाही दाढी ठेवायला लावू असे वादग्रस्त विधान ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एका नव्या वादाला सुरूवात होण्याची चिन्हे दिसत आहेत.

गुरूग्राममध्ये एका मुस्लीम व्यक्तीची जबरदस्ती दाढी काढल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना, ‘ज्यांनी कोणी हे कृत्य केले असेल त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही आमचा गळा कापला तरीही आम्ही मुसलमानच राहणार आहोत. पण आम्ही तुम्हाला मुस्लीम बनवू आणि दाढी ठेवायला भाग पाडू’, असे ओवैसी म्हणाले.

गुरूग्रामच्या सेक्टर ३७ मध्ये एका मुस्लीम तरुणाला जबरदस्ती सलूनमध्ये घेऊन जात त्याची दाढी काढल्याची घटना गेल्या गुरुवारी घडली. धर्माबाबत अपशब्द वापरुन आरोपींनी माझ्यावर हल्ला केला, त्यानंतर फरफटत सलूनमध्ये नेले आणि तेथे मला दाढी काढण्यास भाग पाडले अशी तक्रार पीडित तरुणाने केली आहे. या प्रकरणात तीन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.