‘तुझ्या मुलाला माज आला आहे’ म्हणत माय-लेकराला शिवीगाळ करत तलवारीने मारहाण

130

पिंपरी, दि.१८ (पीसीबी) : ‘तुझ्या मुलाला माज आला आहे. तो आता प्रकाश राम सोबत राहत नाही’ असे म्हणत टोळक्याने माय-लेकराला शिवीगाळ करत तलवारीने मारहाण केली. तसेच हातात तलवार घेऊन नाचत ‘आमच्या गँगशी कोणी पंगा घेतला तर संपवून टाकू’ अशी धमकी दिली. याप्रकरणी तीन महिलांसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि.16) रात्री पावणे अकराच्या सुमारास बौद्धनगर पिंपरी येथे घडली.

एका 38 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश राम (वय 26), अमित सौदे (वय 22), ओमकार (वय 21), चंदन बिहारीराम (वय 23), सनी दुसीया (वय पूर्ण नाव, पत्ता समजू शकले नाही) यांच्यासह तीन महिला अशा आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमित आणि ओमकार यांच्याकडे तलवार होती. या दोघांनी फिर्यादी यांना ‘तुझा मुलगा कुठे आहे’ असे विचारले. त्यावर ‘तु शिवी का देतोस’ असे फिर्यादीने विचाराताच आरोपी म्हणाले ‘तुझ्या मुलाला माज आला आहे. तो आता प्रकाश राम सोबत राहत नाही’.

त्यावर फिर्यादीने ‘तो तुझ्या सोबत का राहील’ असे म्हणताच आरोपी अमित याने त्याच्याजवळील तलवार काढली. घराच्या समोरील पाण्याच्या ड्रममध्ये घुसविली. फिर्यादीने त्यांचा मुलगा अजय याला फोन करुन बोलावले. तो घरी येताच आरोपी अमित, ओमकार हे त्याला हाताने मारहाण करु लागले. अमित याने त्याच्या हातातील तलवार फिर्यादीच्या मुलाच्या पाठीत मारली. त्यामुळे तो घाबरुन तेथून पळाला. त्यानंतर तीन महिला आरोपी, प्रकाश, चंदन तिथे आले. प्रकाश याच्या हातात तलवार होती. तर, आरोपी चंदन, सनी यांच्या हातात लाकडी दांडके होते.

सर्वजण फिर्यादीला शिवीगाळ करत त्यांच्या घरात घुसले. हाताने मारहाण केली. त्यांच्या मुलीलाही हाताने मारहाण करुन ‘हिला चांगलेच मारले पाहिजे’ असे सर्व आरोपी म्हणाले. त्याचवेळी आरोपी अमित याने फिर्यादी महिलेच्या उजव्या हाताच्या पोटरीवर तलवार मारली. दरम्यान, सर्व आरोपी घराच्या बाहेर आले. आरोपी प्रकाश, अमित हातात तलवार घेऊन नाचत होते. ‘आमच्या गँगशी कोणी पंगा घेतला तर संपवून टाकू’ अशी धमकी दिली. फिर्यादीचा मुलगा बौदा उर्फ अजय यास मारण्याची धमकी देऊन त्याच्या पाठीत तलवार मारुन जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

WhatsAppShare