तुझ्या बाळाला जीवे मारून टाकू अशी धमकी दिल्याने महिला पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या

91

वाकड, दि. २२ (पीसीबी) -घर बांधण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी करत सासरच्या लोकांनी पोलीस असलेल्या महिलेचा छळ केला. सासरच्या या छळाला कंटाळून पोलीस कर्मचारी महिलेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत पतीसह सासरच्या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती पवनकुमार बंकिम दहिफळे (वय 29), सासू सागरबाई बंकिम दहिफळे (वय 45), सासरे बंकिम बाबुराव दहिफळे (वय 52), दिर भगवान उर्फ पप्पू बंकिम दहिफळे (वय 24), आज्जे सासू मुक्ताबाई नामदेव वाघ (वय 65, सर्व रा. दैत्यनांदुरा, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

श्रद्धा शिवाजीराव जायभाय (वय 28, रा. कावेरीनगर पोलीस वसाहत, वाकड) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचारी महिलेने नाव आहे. याबाबत त्यांच्या 50 वर्षीय आईने बुधवारी (दि. 21) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत श्रद्धा आणि पावनकुमार यांचा सन 2016 मध्ये विवाह झाला होता. श्रद्धा पुणे पोलीस दलात तर त्यांचे पती भारतीय नौदलात कार्यरत होते. लग्नानंतर सासारच्या लोकांनी श्रद्धा यांच्याकडे माहेरहून घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. तसेच त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन ‘तुला आम्ही नांदवणार नाही. तुला घटस्फोट द्यावा लागेल. नाहीतर तुला व तुझ्या बाळाला जीवे मारून टाकू’ अशी धमकी दिली. श्रद्धा यांना वारंवार शिवीगाळ व मारहाण करून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून 5 जुलै रोजी कावेरीनगर पोलीस वसाहत, वाकड येथे राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare