तुकारामनगरमध्ये राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे विजयादशमीनिमित्त दिमाखदार पथसंचलन

173

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – विजयादशमी पथसंचलन हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जिव्हाळ्याचा विषय. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संत तुकारामनगरात विजयादशमीचे पथसंचलन उत्साही वातावरणात व दिमाखदार स्वरूपात संपन्न झाले. परिसरातील महिलांनी संचलन सुरू होण्यापूर्वी भगव्या ध्वजाचे पुष्पपूजन व औक्षण केले.

पथसंचलनाला खराळवाडी येथील खराळाई मंदिराशेजारील बालभवन येथून सकाळी ८ वाजता सुरूवात करण्यात आले. खराळवाडी, कामगार नगर, गांधीनगर या वस्त्यांमधून मार्गक्रमण करत जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून परत बालभवन येथे आले. ४० मिनिटे चाललेल्या या संचलनाचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत झाले.

संत तुकाराम गटाचे माननीय संघचालक अनिल नाईक हे संचलनासाठी पूर्णवेळ उपस्थित होते. संचलन मार्गावर विविध ठिकाणी त्यांनी संचलनाचे सूक्ष्म निरीक्षणही केले. कार्यकर्त्यांचे उत्कृष्ट नियोजन, स्ववयंसेवकांचा उत्साह, नागरिकांचा प्रतिसाद व पोलिस दलाची सज्जता ही आजच्या संचलनाची वैशिष्ट्ये ठरली.

WhatsAppShare