तीन वर्षांनंतर रायगडाच्या संवर्धनासाठी शासकीय निधी

125

 

मुंबई, दि.३० (पीसीबी)- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत किल्ले रायगडसाठी २० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास तीन वर्षांनंतर किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाकडून निधी प्राप्त होणार आहे, असे असले तरी, तांत्रिक अडचणी आणि आजवर झालेल्या कामांचा अनुभव लक्षात घेता रायगड किल्ला संवर्धनाच्या कामाला गती मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे.

रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी ६०६ कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारने तयार केला. या आराखडय़ाला २०१६ मध्ये मंजुरी देण्यात आली. मात्र प्रत्यक्ष निधी प्राप्त होण्यास २०१७ साल उजाडले. पहिल्या टप्प्यातील कामांसाठी ५९ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आला. मात्र निधी प्राप्त झाल्यावरही जवळपास वर्षभर प्रत्यक्ष कामांना सुरुवात होऊ  शकली नाही. पुरातत्त्व विभागाकडून प्रस्तावित कामांना मान्यता मिळण्यात होणारी दिरंगाई यास कारणीभूत ठरली. त्यामुळे आराखडय़ाला मंजुरी मिळाल्यानंतर जवळपास २ वर्षांनी प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाली.

पहिल्या टप्प्यात या कामासाठी ५९ कोटींचा निधी प्राप्त झाला. यातील दहा कोटी भूसंपादनासाठी, तर ९ कोटी किल्ल्यावरील पायवाटा व इतर कामांसाठी वापरण्यात आले. ४० कोटी रुपये किल्ला संवर्धन व इतर पर्यटन सुविधांसाठी वापरले जाणार आहेत. यासाठी स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना करण्यात आली असून, पुरातत्त्व विभाग आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून ही कामे केली जाणार आहेत.

 

WhatsAppShare