तीन महिने वांग्याचं भूत करुन विषय चघळत ठेवलात; मला तुमचं तोंड बघायचे नाही- संभाजी भिडे

2035

चिपळूण, दि. २३ (पीसीबी) – चिपळूणमध्ये बैठकीसाठी आलेल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी माध्यमांवर आगपाखड केली. चिपळुणात भिडेंच्या सभेला झालेल्या तीव्र विरोधावर माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी बातचित करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी, “गेले तीन महिने वांग्याचं भूत करुन विषय चघळत ठेवलात”, अशी टीका संभाजी भिडे यांनी केली आणि त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.

रत्नागिरी जिल्ह्यातील शिवप्रतिष्ठानच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. “तुम्ही बेकार आहात. गेले तीन महिने वांग्याचं भूत करुन, विषय चघळत ठेवलात. मला तुमचे तोंड बघायचे नाही.” असे संभाजी भिडे माध्यमांना उद्देशून म्हणाले.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांना काल चिपळूणमधील कार्यकर्त्यांच्या बैठकीदरम्यान मोठा विरोध झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र अशा परिस्थितीत संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक जवळपास तीन तास चालली.