तीन कारखान्यांमध्ये ४५ लाखांची वीजचोरी उघड

114

– महावितरणच्या भरारी पथकांची कामगिरी

पुणे, दि. २ (पीसीबी) : वीजमीटरमध्ये फेरफार करून तीन कारखान्यांमधील २ लाख ९३ हजार २१६ युनिटची म्हणजे ४५ लाख ६४ हजार रुपयांची वीजचोरी महावितरणच्या भरारी पथकांनी नुकतीच उघडकीस आणली आहे. वीजचोरीच्या तिनही प्रकरणांमध्ये वीजचोरी व दंडाचे एकूण ८४ लाख ८४ हजार रुपयांचे वीजबिल देण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी, की भोसरी एमआयडीसीमधील प्रिसिशन टेक्नॉलॉजी अॅण्ड हिट हिटर्स या औद्योगिक ग्राहकाने मंजूर जोडभारापेक्षा अधिक वीज वापरत तसेच मीटरमध्ये फेरफार करून गेल्या सात महिन्यांमध्ये १ लाख १० हजार ४९० युनिटची म्हणजे १६ लाख ७९ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले. वीजचोरी व दंडाचे या ग्राहकास ४० लाख १९ हजार रुपयांचे वीजबिल देण्यात आले आहे. तसेच पुणे शहरातील खडी मशीन रस्त्यावरील फायबर ग्लास इंड. एक्यूपमेन्टस् या औद्योगिक ग्राहकाने देखील मंजूर वीजभारापेक्षा अधिक वीजवापर करीत रिमोटच्या सहाय्याने गेल्या १५ महिन्यात ७४ हजार ५३४ युनिटची म्हणजे १२ लाख ५० हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले. वीजचोरी व दंडाचे या ग्राहकास १७ लाख ६० हजार रुपयांचे वीजबिल देण्यात आले आहे.

खेड तालुक्यातील धानोरे येथील आनंद वायर प्रॉडक्ट प्रा. लि. या औद्योगिक ग्राहकाने वीजमीटरमध्ये फेरफार करून गेल्या नऊ महिन्यांमध्ये १ लाख ८ हजार १९२ युनिटची म्हणजे १६ लाख ३५ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे निदर्शनास आले. वीजचोरी व दंडाचे या ग्राहकास २७ लाख ५ हजार रुपयांचे वीजबिल देण्यात आले आहे. या तिनही कारखान्यातील वीजचोरीप्रकरणी भारतीय विद्युत कायदा २००३ मधील कलन १३५ नुसार कारवाई सुरु आहे.

वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक (प्रभारी, मुंबई) कमांडर शिवाजी इंदलकर यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाचे उपकार्यकारी अभियंता आवधकिशोर शिंदे, कनिष्ठ अभियंता कैलास काळे, सहायक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी अश्विनी भोसले, वरिष्ठ तंत्रज्ञ ज्ञानेश्वर शेवाळे आदींनी ही कामगिरी केली.