तिरंग्यासाठी ‘ही’ महिला पत्रकार खलिस्तान्यांना एकटीच ‘नडली’, नेटकऱ्यांनी ठोकला कडक ‘सॅल्यूट’

200

लंडन, दि. १८ (पीसीबी) – १५ ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केवळ देशातच नाही तर परदेशातही भारतीयांनी तिरंगा फडकावून स्वतंत्र्य दिनाचा जल्लोष केला. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तामध्येही तिरंगा फडकला. मात्र , यावेळी भारतीय उच्चायुक्‍तालया बाहेर पाकिस्तान आणि खलिस्तान समर्थकांनी विरोध प्रदर्शन केले. ते इतक्यावरच थांबले नाहीत तर भारताचा राष्ट्रध्वज पायदळी तुडवण्याचा आणि अपमान करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.

ज्यावेळी लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्‍तालया बाहेर पाकिस्तान आणि खलिस्तानचे समर्थक तिरंग्याचा अपमान करण्याच्या प्रयत्नात होते, त्यावेळी तेथे उपस्थित भारतीय पत्रकार पूनम जोशी या विरोध प्रदर्शन करणाऱ्यांना भिडल्या. वृत्तसंस्था एएनआयच्या पत्रकार पूनम जोशी यांनी पळत जाऊन घोषणाबाजी करणाऱ्यांच्या हातातून तिरंगा हिसकावून घेतला, आणि रस्त्यावर टाकलेला दुसरा तिरंगा देखील तेथून उचलून घेतला. हा व्हिडिओ एएनआयने ट्विटरवर टाकल्यानंतर पूनम जोशींच्या देशभक्ती आणि हिंमतीवर भारतीय नेटकरी भलतेच फिदा झाले, आणि काही वेळातच हा व्हिडिओ ट्विटरवर ट्रेंड व्हायला सुरूवात झाली.

शेकडो जमावाच्या गर्दीत जावून या महिला पत्रकाराने तिरंग्याचा मान ठेवला आणि आंदोलनकर्त्यांशी भिडली त्यामुळे तिचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे. अनेकजण या भारतीय महिला पत्रकाराला ट्विटरद्वारे कडक सॅल्यूट ठोकत आहेत. पूनम जोशी आम्हाला तुमचा अभिमान आहे. तुमच्यासारख्या भारतीयांचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव करण्याची आवश्यकता आहे. असे ट्विट गोपाळ त्रिवेदी नावाच्या एका ट्विटर युजरने केलेय. या ट्विटमध्ये त्रिवेदी यांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्री जयशंकर प्रसाद यांनाही मेन्शन केले आहे.