तिकीट मिळाले नाही, तर राष्ट्रवादी सोडणार; नंदुरबारमधील नेत्याचा शरद पवारांना इशारा

287

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला लागलेली गळती उत्तर महाराष्ट्रापर्यंत पोहचली आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली तरी राष्ट्रवादीतील गळतीसत्र थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीत. त्यात नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी “तिकीट मिळाले नाही, तर तिकीट मिळेल त्या पक्षात जाऊ,” असे सांगत अप्रत्यक्ष राष्ट्रवादी सोडण्याचा इशारा शरद पवार यांना दिला आहे.

राष्ट्रवादीचे नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी पक्षा सोडण्याचा इशारा दिल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादीत सर्वकाही आलबेल नाही, हे समोर आले आहे. २०१४ मध्ये राजेंद्र गावित यांनी शहादा-तळोदा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागांवाटप झाले असले, तरी कोणती जागा कुणाला जाणार याबाबत संभ्रम कायम आहे. या भीतीपोटी राजेंद्र गावित यांनी सोमवारी (२३ सप्टेंबर) शहादा इथे कार्यकर्ता मेळावा घेतला. “तिकीट न मिळाल्यास ज्या पक्षातून तिकीट मिळेल, त्यात जाऊ, असा इशारा त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिला आहे.

नंदुरबारमधील चारही विधानसभा मतदारसंघ आघाडीच्या वाटाघाटीत काँग्रेसला सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या नंदुरबार जिल्ह्यातील दोन मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी ज्या शहादा-तळोदा मतदारसंघातून मागील विधानसभा निवडणूक लढवली होती. त्या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीचे मतांमध्ये फुट पडली. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार पद्माकर वळवी यांचा ७१९ मतांनी पराभव झाला होता. तर राजेंद्र गावित तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले होते. गावित यांनादेखील विजयी उमेदवारांपेक्षा ११५९० मते कमी मिळाली होती. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस उमेदवार राहिल्याने हा मतदारसंघ काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे अशीच परिस्थिती नवापूर मतदारसंघातही आहे. याठिकाणी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरुपसिंग नाईक असले, तरी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार शरद गावित यांनी राष्ट्रवादीला ही जागा सोडण्याची मागणी केली आहे. याच मतदारसंघाच्या जागा वाटपावरून गेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडीत मोठा तिढादेखील निर्माण झाला होता. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसला सुटल्यास शरद गावितही बंडखोरी करू शकतात.

WhatsAppShare