तासगावात पतीला कारमध्ये डांबून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

812

सांगली, दि. २ (पीसीबी) – पतीला कारमध्ये डांबून गर्भवती महिलेवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.३१ जुलै) रात्रीच्या सुमारास तासगावातील तुरची फाटा येथे घडली.

याप्रकरणी आज (गुरुवार) सकाळी तासगाव पोलिस ठाण्यात पीडित महिलेने आठ जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार सागर, मुकुंद माने, जावेद खान, विनोद यांच्यासह आणखी चार जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

तासगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत जोडपे गेल्या काही दिवसांपासून तुरची फाट्यावर हॉटेल व्यावसाय करत होते. हॉटेल कामासाठी त्यांना एक जोडपे हवे होते. त्यांनी तसे एका ग्राहकाला सांगितले. मंगळवारी आरोपी मुकुंदने पतीशी संपर्क साधून तुम्हाला हवे असलेले जोडपे मिळाले असल्याचे कळवले. त्यांना भेटण्यासाठी तुम्ही तुरची फाट्यावर या आणि ‍अॅडव्हान्स देण्यास २० हजार रुपये घेऊन येण्यासही सांगितले. तुरची फाटा येथील एका चाळीजवळ पीडिता आणि पती पैसे घेऊन गेले असता, दाम्पत्यास प्लास्टिकच्या पाईपने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडील सोने आणि रोकड हिसकावून घेतली. त्यानंतर पीडित महिलेच्या पतीला बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये डांबून ठेवले व महिलेवर तेथीलच एका खोलीत बलात्कार केला. तासगाव पोलिसांनी याप्रकरणी आठ जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करुन त्यांची धरपकड सुरु केली आहे.