तासगावात आर.आर.पाटील यांच्या पत्नीविरोधात सीमा आठवले उभा राहणार…

282

तासगाव, दि. ११ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी तासगाव- कवठे महांकाळमधून राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास तयार आहोत, अशी घोषणा केली आहे. तासगाव येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.

सीमा आठवले म्हणाल्या, तासगावच्या सर्वांगीण विकासासाठी दिल्लीतून निधी खेचून आणू, दुष्काळी भागातील शेतकरी, शेतमजुरांचे आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न आगामी काळात पूर्णत्वास नेण्यासाठी लक्ष घालणार आहे. तसेच महिलांच्या विकासासाठी राज्य व केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी रिपब्लिकन महिला आघाडीने प्रयत्न केले पाहिजेत, असा आदेशवजा सल्ला सीमा आठवले यांनी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांना दिला.

तासगाव-कवठे महांकाळ मतदारसंघ राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर.आर. पाटील अर्थात आबांचा बालेकिल्ला आहे. आबा 2014 च्या निवडणुकीतही विजयी झाले. मात्र, त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी सुमन पाटील विजयी झाल्या. आताही राष्ट्रवादीकडून सुमन पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

तर भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्या पत्नी ज्योती पाटील यांनी तासगावमधून भाजपतर्फे तिकिटासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे या मतदार संघात तिरंगी लढत पाहयला मिळणार आहे.