तामिळनाडूमध्ये भाजपविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या लेखिकेला अटक

95

चेन्नई, दि. ४ (पीसीबी) – तामिळनाडूमध्ये भाजपविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या लूई सोफिया या लेखिकेला अटक करण्यात आली आहे. तूतीकोरिन विमानतळावर भाजपच्या प्रदेशाध्यक्षा तमिलसाई सुंदरराजन यांच्यासमोर या लेखिकेने ‘भाजप सरकार हाय-हाय’, असे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली होती. 

या घोषणाबाजीवरून लूई आणि सुंदरराजन यांच्यात खडाजंगी झाली होती. त्यानंतर सुंदरराजन यांनी लूईविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी लुई सोफिया यांना अटक केली. त्यानंतर सोफिया यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांची कोकिराकुलम तुरूंगामध्ये रवानगी करण्यात आली आहे.

दरम्यान, ही अटक लोकशाही व व्यक्तीस्वातंत्र्यांवर घाला घालणारी आहे. याला राज्य सरकार जबाबदार आहे, असा आरोप ‘डीएमके’चे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी करून सोफियांची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली आहे. तर सोफियांच्या वडिलांनी सुंदरराजन आणि भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध मुलीला धमकावणे आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करून  त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.