ताथवडेत गाडीला कट मारल्याच्या रागातून टेम्पोचालकाला लोखंडी टॉमीने जबर मारहाण

135

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – गाडीला कट मारल्याच्या रागातून दोन जणांनी मिळून टेम्पो चालकाला लोखंडी टॉमीने जबर मारहाण करत गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. ९) दुपारी साडेबाराच्या सुमारास ताथवडे येथील इंदिरा कॉलेजच्या गेटसमोर घडली.

सिदाप्पा उचप्पा पुजारी (वय २८, रा. ताथवडे, ता. मुळशी) असे जखमी टेम्पो चालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी टेम्पोचालक पुजारी हे मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावरून टेम्पो घेऊन जात होते. त्यावेळी दोनजण पुजारी यांच्याजवळ आले. ‘आमच्या गाडीला कट का मारला’ असे म्हणत पुजारी यांना लोखंडी टॉमीने मारहाण केली. यामध्ये पुजारी यांच्या पाठीवर, कमरेवर, पायावर गंभीर दुखापत झाली आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. हिंजवडी पोलिस तपास करत आहेत.