तळेगावात बेकायदेशीरपणे मद्य वाहतूक करणाऱ्या गाडीसह अडीच लाखांचे विदेशी मद्य जप्त

147

तळेगाव, दि. १७ (पीसीबी) – शहरातील तळेगाव-चाकण रस्त्यावर बेकायदेशीरपणे मद्य वाहतूक करणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीतून अडीच लाखांचे मद्य तळेगाव पोलिसांनी जप्त केले आहे.

याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी राहूल प्रमोद शर्मा (वय २५, रा. कुसगाव, मावळ) आणि बालमुकुंद कमलेश चौरसिया (वय २१, रा. मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गुप्त बातमीदाराकडून तळेगाव पोलिसांना तळेगाव-चाकण रस्त्यादरम्यान स्कॉर्पिओ गाडीतून मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याच्या बाटल्या बेकायदेशीरपणे वाहतूक केल्या जातात अशी खात्रीशीर माहिती मिळाली. यावर तळेगाव पोलिसांनी तळेगाव-चाकण रस्त्यावर सापळा रचून स्कॉर्पिओ गाडी ताब्यात घेतली. गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये तब्बल अडीच लाख रुपयांचे विदेशी मद्य आढळून आले. पोलिसांनी गाडी आणि मद्यासह एकूण सात ते आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच गाडीतील राहूल आणि बालमुकुंद या दोघांना अटक केली आहे. तळेगाव पोलिस अधिक तपास करत आहेत.

ही कारवाई डीवायएसपी जी.एस.माडगूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, विठ्ठल वेडेकर, नामदास आणि प्रशांत वाबळे यांच्या पथकाने केली.