तळेगावात गोळीबार…! अकरावीत शिकणाऱ्या मुलाची हत्या

581

तळेगाव,दि.२३(पीसीबी) – पोलीस आयुक्तालय हद्दीत आणखी एक गोळीबाराची घटना समोर आली आहे. तळेगावमध्ये अकरावीत शिकणाऱ्या मुलावर गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. दशांत परदेशी असं 17 वर्षीय मुलाचे नाव होते. काल सायंकाळी 6 वाजता तो घराबाहेर पडला. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतलाच नाही. त्यामुळे कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली, शोधकार्य सुरू असताना त्याचा मृतदेह आढळून आला.

डोक्याला गोळी लागलेली होती. एका बंद पडलेल्या कंपनीसमोर तो मृतावस्थेत होता. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल आहे. त्याचा कोणाशी काही वाद नव्हता असं कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलेलं आहे. मग ही हत्या कोणी आणि का केली? हा प्रश्न पोलिसांसमोर उभा आहे.

दरम्यान गेल्या शनिवारी पिंपळेगुरव परिसरात भरदिवसा गोळीबार झाला होता. तेव्हा योगेश जगताप नावाच्या गुन्हेगाराची हत्या झाली. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला होता. गोळीबार करणारे अज्ञात हे दुचाकीवरून आले होते. पिंपळेगुरवमध्ये सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले होते. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. तीन अज्ञात दुचाकीवरून आले होते. त्यांनी केलेल्या गोळाबारात तीन पैकी दोन गोळ्या योगेश जगताप यांच्या छातीत लागल्या, यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता.