तळेगावमध्ये चांगल्या नफ्याचे आमिष दाखवून तिघांना पाच लाखांचा गंडा

86

तळेगाव, दि. ११ (पीसीबी) – कंपनीत पैसे गुंतवल्यास चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून चार जणांनी मिळून तिघांना पाच लाखांचा गंडा घातला. ही घटना जून २०१३ ते मार्च २०१९ दरम्यान मावळ तालुक्यातील धामणे येथे घडली.

याप्रकरणी भरत दत्तात्रय आढाव (वय ४५, रा. धामणे, ता. मावळ) यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  त्यानुसार चंद्रकांत महादेव मोरे (वय ५३), निर्मला महादेव मोरे (वय ४८), प्रतीक महादेव मोरे (वय २५, तिघे रा. पाटील नगर, चिखली), रामचंद्र मनी गट्टा (वय ४९, रा. बोरडेवाडी, मोशी) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून २०१३ ते मार्च २०१९ या कालावधीत बिग व्हिजन या कंपनीचे मालक चंद्रकांत मोरे आणि अन्य सर्व आरोपींनी संगनमत करून फिर्यादी आणि त्यांचे मित्र युवराज सोरटे, दत्तात्रय जांभूळकर यांना त्यांच्या कंपनीत आर्थिक गुंतवणूक करण्यास सांगून जादा पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी त्यांनी कंपनीची बनावट कागदपत्रे बनवली. त्यानंतर आरोपींनी ठरल्याप्रमाणे फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना नफा तसेच गुंतवलेली रक्कम न देता त्यांची तब्बल पाच लाख रुपयांची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे तपास करत आहेत.