तळीरामांसाठी आनंदवार्ता… हँगओव्हरमुळे घेऊ शकता सुट्टी; न्यायालयाचा निर्णय

421

जर्मनी, दि. ५ (पीसीबी) – एखाद्या दिवशी आदल्या रात्री झालेल्या पार्टीमध्ये अधिक दारु प्यायल्याने हँगओव्हर न उतरल्याचे कारण देत तुम्ही कधी तुमच्या बॉसकडे सुट्टी मागितली आहे का? अर्थात अशी सुट्टी मागण्यासाठी हिंमत लागते आणि सर्वांमध्येच असते असं नाही. त्यामुळेच अनेकदा हँगओव्हरमुळे डोक दुखत असतानाही अनेकजण ऑफिसला जातात. मात्र तुम्ही जर्मनीत असाल तर तुम्हाला हँगओव्हर झाल्यास सुट्टी मिळू शकते. आहो नाही ही खोटी बातमी किंवा मस्करी नसून खरोखरच जर्मनीमधील एका न्यायालयाने हँगओव्हर हे ‘आराजपण’ असल्याचा निर्णय दिला आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार जर्मनीमधील न्यायालयाने दारुची नशा न उतरणे म्हणजे हँगओव्हर दुसऱ्या दिवशीही सकाळी कायम असणे हे आजारपण असल्याचा निर्णय दिला आहे. तसेच हँगओव्हर उतरलेला नसताना एखाद्या व्यक्तीला ऑफिसला बोलावणे बेकायदेशीर असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

स्थानिक उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार “एखाद्या खाद्यपदार्थावरील छापील माहिती त्या पदार्थाचे सेवन केल्यास एखाद्या व्यक्तीचे आजारापासून बचाव होईल, उपचार होईल किंवा उपचारांवर परिणाम होईल अशाप्रकारच्या कोणत्याही गुणधर्मांची ठोसपणे कबुली देऊ शकत नाही. तसेच त्या पदार्थाच्या गुणधर्मांमुळे आजारी पडल्याचे सांगता येत नाही,” असे मत नोंदवले आहे.

जर्मनीमध्ये दरवर्षी म्युनिक शहरात होणाऱ्या ओक्टोबीरफेस्ट नंतर हँगओव्हर आजार आहे की नाही याबद्दल वाद निर्माण झाला. दरवर्षी होणाऱ्या या सोहळ्यामध्ये मोठ्याप्रमाणात बियरचे सेवन केले जाते. त्यामुळेच दुसऱ्या दिवशी अनेकांनी डोके दुखीचे कारण देत सुट्टी घेतली. त्यावरुनच हा वाद न्यायालयात गेला आणि तिथेही न्यायालयाने हँगओव्हर उतरला नसेल तर आजारपणाची सुट्टी घेण्यात काहीच गैर नसल्याचे मत नोंदवले. सध्या जर्मनीमधील न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाची जगभरात चर्चा होताना दिसत आहे.

WhatsAppShare