जुनी खुन्नस काढण्यासाठी चार जणांच्या टोळीने एका २० वर्षीय तरुणावर तलवारीने वार करुन प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि.१) रात्री उशीरा तळवडे येथे घडली.

नितीन महावीर चंदनशिवे (वय २०, रा. सिध्दनाथ हाऊसिंग सोसायटी, रुपीनगर तळवडे) असे वार होऊन गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हल्लेखोर  रोहित सकट, हृतिक सकट, बबलू (तिघेही रा. दळवीनगर, निगडी), आक्या बॉण्ड (रा. घरकुल, चिखली) यांच्या विरुध्द निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन चंदनशिवे हा रविवारी रात्री जेवण करून तळवडे येथील एका पानपटीवर थांबला होता. त्यावेळी तेथे वरील आरोपी आले. त्यांची नितीन सोबत दीड महिन्यापूर्वी भांडणे झाली होती. याच भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी लोखंडी कोयता आणि तलवारीने नितीनवर वार केले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. यावेळी भांडणे सोडविण्यासाठी नितीन चा भाऊ प्रवीण तेथे आला मात्र त्यालाही आरोपींनी मारहाण केली. नितीन ला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.