तळवडेत पोलिसांना मारहाण करणाऱ्या दोघांना अटक

246

तळवडे, दि. २८ (पीसीबी) – वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या रागातून दोन पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण करुन जखमी करण्यात आले. ही घटना तळवडेतील त्रिवेणीनगर चौकात घडली.

या घटनेत हवालदार रामहरी तनपुरे आणि विकास आवटे हे दोघेही जखमी झाले आहेत. त्यांनी पोलीसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी दीपक शंकर यादव (वय ३९, रा. त्रिवेणीनगर) आणि सतीश सोपान खराडे (वय ३२, रा. मोशी प्राधिकरण) या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी एकच्या सुमारास त्रिवेणीनगर चौकाजवळील शरदनगर झोपडपट्टीसमोरील रस्त्यावर वाहतूक नियमन सुरू होते. त्या वेळी रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने आरोपींनी मोटार रस्त्यावर उभी केली होती. त्या वेळी तनपुरे यांनी त्यांना मोटार बाजूला घेण्यासाठी सांगितले. मात्र, आरोपींनी नकार देत शिवीगाळ केली.तनपुरे यांच्या मदतीला आवटे आले असता, त्यांनाही शिवीगाळ करून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले. पोलिसांनी आरोपी दीपक आणि सतीश या दोघांना अटक केली आहे.