तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी बालाजीनगरच्या सात जणांवर गुन्हा दाखल

30

भोसरी, दि. १९ (पीसीबी) – बालाजीनगर चौक, भोसरी येथे एका टोळक्याने तलवारीने केक कापत वाढदिवस साजरा केला. याप्रकरणी पोलिसांनी तब्बल दोन आठवड्यानंतर संबंधित सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पीसीबी टुडे मधून फोटोसह वृत्त प्रसिध्द होताच पोलिस खडबडून जागे झाले. त्यातच सोशल मीडियावरही या वाढदिवसाचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याचे पाहून नागरिकांनी पोलिसांवर तोंडसुख घेतले आणि पोलिस काय करतात, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. नंतर माध्यमांतून या वाढदिवसाच्या बातम्या झळकल्या. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखव केला आणि चार गुंड प्रवृत्तीच्या तरुणांना बेड्या ठोकल्या.

गंभीर गुन्हे दाखल असणाऱा गुंड सलीम शेख याच्या वाढदिवसा निमित्त भर रस्त्यात तलवारीने केक कापण्यात आल्याने बालाजीनगर परिसरात दहशत निर्माण झाली होती. पोलिसांनी सोशल मीडियातील फोटो मध्ये दिसणारे स्वप्नील पोटभरे, महेंद्र सरवदे, सलीम शेख, अभिषेक देवकर (सर्व रा. बालाजीनगर, भोसरी) आणि अन्य 2 ते 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई विशाल काळे यांनी रविवारी (दि. 18) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तलवारीने केक कापण्याची घटना 5 ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजताच्या सुमारास बालाजीनगर चौक, टेल्को रोड, भोसरी येथे घडली. आरोपीचा वाढदिवस असल्याने त्यांनी वाढदिवसाचा केक तलवारीने कापून त्याचे प्रदर्शन केले. या घटनेला घडून तब्बल दोन आठवड्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बालाजीनगर परिसरात या घटनेमुळे दहशतीचे वातावरण होते.

दरम्यान या वाढदिवसाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यापूर्वी राजरोसपणे तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या तथाकथित भाईंना पोलिसांनी खाकीचा प्रसाद दिला आहे. त्यामुळे मधल्या काही कालावधीत हे प्रकार बंद झाले होते. मात्र पुन्हा असे प्रकार समोर येत असल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

WhatsAppShare