…तर शिवसेनेला युतीमध्ये पुण्यामधून एक ही जागा नाही; शिवसेना इच्छुकांनमध्ये नाराजी

140

 पुणे, दि, २४ (पीसीबी) – लोकसभेत युती केल्यानंतर आगामी विधानसभेसाठी देखील भाजप – शिवसेनेकडून एकत्र लढण्याचे निश्चित झाले आहे, मात्र मुख्यमंत्री कोणाचा होणार यावरून आत्ताच कलगीतुरा रंगताना दिसत आहे. मुख्यमंत्री पदावरून सुरु असणाऱ्या वादामध्ये आता भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जागा वाटपा संदर्भात केलेल्या वक्तव्याने शिवसेना नेत्यांची चिंता वाढणार आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांच्यात ५०-५० फॉर्म्युला ठरलेला आहे. परंतु २०१४ ला भाजपाने जिंकलेल्या १२३ जागांपैकी एकही जागा सोडणार नाही असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी स्पष्ट केले आहे. २०१४ ला भाजपने १२३ तर शिवसेनेनी ६३ जागा जिंकल्या होत्या.

दानवे यांच्या दाव्यानुसार युतीचे जागावाटप झाल्यास पुणे शहरातील आठ मतदारसंघांपैकी एकही जागा शिवसेनेला सुटणार नाही, त्यामुळे शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्यांची धाकधूक वाढली आहे. २०१४ साली शहरातील आठही मतदारसंघांमध्ये भाजपचे कमळ फुलले होते. यंदा शिवसेनेचे पारंपारिक मतदारसंघ असणारे हडपसर, वडगाव शेरी, शिवाजीनगर, खडकवासला अथवा कोथरूडची जागा मिळवण्यासाठी स्थानिक नेते आग्रही आहेत.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतर शहरातील सर्व मतदारसंघात भाजपला घवघवीत यश मिळाले, महानगरपालिका निवडणुकीत देखील भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे, राज्याच्या राजकारणात पुणे शहर केंद्रस्थानी असल्याने भाजप आता शिवसेनेला जागा सोडणार का ? हा प्रश्न आहे. दरम्यान, या संदर्भात विचारल असता शिवसेनेच्या शहराध्यक्षांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील म्हणत बोलणे टाळले आहे.