…तर शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होईल – उध्दव ठाकरे

45

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – पदवीधर निवडणुकीतील विजयाचे सर्व श्रेय शिवसैनिकांना आहे, असे सांगून या निवडणुकीत ज्या पध्दतीने लढत दिली, तशी आगामी निवडणुकीत लढत दिली, तर शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला.

मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या विजयानंतर आभार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उध्दव ठाकरे बोलत होते. यावेळी आमदार विलास पोतनीस, खासदार संजय राऊत, नगरसेवक, शाखाप्रमुख आदी उपस्थित होते.

हा विजयाचा सत्कार माझा नाही किंवा विलास पोतनीसांचा नाही, तर तो तुमचा विजय आहे, असे सांगून उध्दव ठाकरे यांनी विजय शिवसैनिकांना अर्पण केला.

आता येथून पुढे केवळ लढत राहायचे आहे. आपला मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न आहे. जर तुमच्यासारखे शिवसैनिक एकत्र आले तर तेही स्वप्न पूर्ण होण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास उध्दव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.