…तर लोकसभा, विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार घालू – फारूख अब्दुल्ला

106

श्रीनगर, दि. ८ (पीसीबी) – काश्मीरला विशेषाधिकार देणाऱ्या संविधानातील अनुच्छेद ३७० आणि स्थानिक नागरिकांची परिभाषा ठरविण्याचा अधिकार देणाऱ्या अनुच्छेद ३५ (ए) संदर्भात  केंद्र सरकारने खुलासा केला पाहिजे. अन्यथा लोकसभा, विधानसभा निवडणुकीसह पंचायत समित्यांच्या निवडणुकांवरही बहिष्कार घालू, असा इशारा नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी दिला आहे.

केंद्र सरकारने अनुच्छेद ३७० आणि ३५ (ए) बाबतची भूमिका स्पष्ट न केल्यास आमचा पक्ष  पंचायत समितीसह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकेन, असे अब्दुल्ला  म्हणाले. पीडीपीनेही केंद्र सरकारने पंचायत समितीच्या निवडणुका आणि अनुच्छेद ३५ (ए) बाबत भूमिका स्पष्ट करावी. तरच आम्ही निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊ, असे म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरसाठी स्वतंत्र संविधान असणे ही त्रुटी होती. देशाच्या अखंडतेबाबत कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी म्हटले होते. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील राजकारण तापले आहे.