…तर भिडे गुरुजींवर कारवाई करू – देवेंद्र फडणवीस

44

नागपूर, दि. ९ (पीसीबी) – मनु हा संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांपेक्षाही श्रेष्ठ होता, असे विधान करणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. संभाजी भिडे यांच्या विधानाची व्हिडिओ क्लिप तपासून पाहू. त्यात असंवैधानिक आढळल्यास कारवाई करू, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली आहे.
‘गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करून आपल्या हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला शिकवणारा मनू हा संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांपेक्षाही श्रेष्ठ होता,’ असे धक्कादायक विधान भिडे यांनी पुण्यात केले होते. मनूला श्रेष्ठ मानणाऱ्या भिडेंवर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली होती. त्यावर निवेदन देताना मुख्यमंत्र्यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. भिडे यांच्या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप तपासून पाहण्यात येईल. त्यात असंवैधानिक आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
सरकार मनुच्या विचारांचे समर्थन करत नाही. हे सरकार संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या विचारांशी, तसेच राज्यघटनेशी बांधिल आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.