…तर प्रणव मुखर्जींना पंतप्रधानपदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा

160

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कार्यक्रमाला आमंत्रित करण्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काहीतरी आडाखे असणार आहेत. त्यांचा काही अजेंडा असेल तो २०१९ च्या निवडणुकीनंतर समोर येईल. त्यावेळी भाजपला बहुमत न मिळल्यास लोकसभेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास प्रणव मुखर्जी यांना ‘सर्वमान्य’ म्हणून पुढे करून राष्ट्रीय सरकार स्थापन करायचे, असा एक अजेंडा संघाच्या कार्यक्रमपत्रिकेवर आहे, असा दावा शिवसेनेने केला आहे.

प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला गुरूवारी हजेरी लावली होती. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून भाष्य केले आहे.

संघ खरेच बदलला आहे, हे आता पटू लागले. इफ्तार पार्ट्या जेव्हा काँग्रेसवाले देतात तेव्हा ती धर्मांधता व संघ देतो तेव्हा ती सहिष्णुता असे आपण सर्वांनी समजून घ्यायलाच हवे. एक धर्म, एक विचार, एक निशाण, एक भाषा वगैरे देशाची ओळख नव्हे, असे मुखर्जी यांनी संघाच्या व्यासपीठावर जाऊन सांगितले. संघाने टाळ्या वाजवल्या. काँग्रेसवाले मूर्ख आहेत म्हणून त्यांनी नागपुरात जाण्यापासून प्रणवबाबूंना रोखण्याचा प्रयत्न केला. चला, हिंदुत्वाच्या नावानं चांगभलं,’ असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे