तर देशातील तरुण रस्त्यावर उतरेल

4

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर असलेल्या रघुराम राजन यांनी एका वेबिनारमध्ये बोलताना केंद्र सरकारला बेरोजगारीसंदर्भात गंभीर इशारा दिला आहे. भारतामध्ये वेळीच रोजगार निर्मिती झाली नाही तर देशातील तरुण रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील अशी भीती राजन यांनी व्यक्त केली आहे. देशातील तरुणांना रोजगार हवा आहे. रोजगारासारख्या मुळ मुद्द्यांऐवजी सोशल मीडिया आणि खोट्या बातम्यांच्या आधारे त्यांना दुसरीकडे अडकवून ठेवता येईल मात्र हे फार काळ काम करणार नाही, असंही राजन यांनी स्पष्ट केलं आहे.

“रोजगार नसणाऱ्या तरुणांना काही काळ कोणत्या ना कोणत्या गोष्टींकडे आकर्षित करता येईल, मात्र ते अधिक काळ टीकवता येणार नाही. वेळीच रोजगार निर्मिती केली नाही तर तरुण रस्त्यावर उतरतील. त्यांचे मूळ मुद्द्यांपासून त्यांना विचलित करण्यासाठी सोशल नेटवर्किंग आणि खोट्या बातम्यांचा वापर मर्यादित कालावधीसाठी केला तरी नंतर ते फारसे प्रभावी ठरणार नाही,” असंही राजन यांनी म्हटलं आहे. राजन हे भवन्सच्या एसपी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्चने आयोजित केलेल्या सेंटर फॉर फायनॅनशियल स्टडिजच्या विद्यार्थ्यांसाठीच्या वेबिनारमध्ये बोलत होते.

यावेळी राजन यांनी केंद्र सरकराच्या ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेअंतर्गत आयातीसंदर्भातील धोरणांबद्दलही इशारा दिला आहे. यापूर्वीही भारताने इतर देशांवर दबाव निर्माण करण्यासाठी असा उपक्रम राबवला होता मात्र त्यात फारसे यश आले नव्हते, अशी आठवण राजन यांनी करुन दिली. चीनचा प्रगतीचे विश्लेषण करताना राजन यांनी चीनच्या निर्यातीत वाढ होण्यामागे तेथील असेम्बली मार्केट म्हणजेच वेगवेगळ्या वस्तू एकत्रित करुन करण्यात येणारे उत्पादन कारणीभूत असल्याचे सांगितले. “त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी जमा केल्या. त्यापासून प्रोडक्ट निर्माण केले आणि त्यांची निर्यात केली. त्यामुळे एकदम भरमसाठ वाढ करण्याऐवजी भारतामध्ये असे वातावरण निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे,” असं राजन यांनी म्हटलं आहे.

राजन यांनी सरकारी खर्चावरही आक्षेप व्यक्त करत हे पैसे दिर्घकालीन योजनांअंतर्गत वापरता आले असते असं निरिक्षण नोंदवलं आहे. देशभरातील आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी काम करणे गरजेचे आहे, असंही राजन यांनी म्हटलं आहे. जीडीपीच्या ५० टक्के क्रेडीट अशी आपली भयंकर अवस्था असल्याचे सांगत यासंदर्भातील निर्णय घेण्याची गरज असल्याचे राजन म्हणाले आहेत. आपण क्वालिटी (दर्जा) आणि क्वांटिटी (प्रमाण) दोन्हीमध्ये मार खात आहोत, अशा शब्दांमध्ये राजन यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

WhatsAppShare