…तर तेलंगण राष्ट्र समिती भाजपला पाठिंबा देईल – के. चंद्रशेखर राव

63

हैदराबाद, दि. ५ (पीसीबी) – दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यात महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी २०१९ मधील लोकसभा निवडणुकीनंतर तेलंगण राष्ट्र समिती भाजपला पाठिंबा देईल, असे राव यांनी मोदींना आश्वस्त केल्याचे सांगितले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात या दोघांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चाही झाली.  

दिल्लीमध्ये शनिवारी के. चंद्रशेखर राव यांनी मोदींची भेट घेतली. यावेळी भाजपशी निवडणूकपूर्व आघाडी करणे आमच्यासाठी फायद्याचे नाही; मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आले तर, तेलंगण राष्ट्र समिती  भाजपला पाठिंबा देईल, असे राव यांनी मोदींना सांगितल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू भाजपप्रणित एनडीएतून बाहेर पडले आहेत. त्यानंतर    भाजपने राव यांच्याशी जवळीक वाढवून त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मोदी आणि राव यांच्या भेटीमुळे भाजप आणि तेलंगण राष्ट्र समिती यांच्यातील ‘मैत्रीचा नवा पूल तयार होत आहे. हा पूल आगामी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला सत्तेपर्यंत पोहचवण्यास आधार ठरू शकतो.