..तर इथेच विष घेऊन आत्महत्या करीन- सुनील तटकरे

80

नागपूर, दि. १४ (पीसीबी) – इयत्ता सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात ७ पाने गुजराती भाषेत छापल्यावरून विधान परिषदेत शुक्रवारी गोंधळ झाला. या मुद्द्यावर प्रश्न विचारणाऱ्या सुनील तटकरेंनाच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खोटे ठरवण्याचा प्रयत्न केल्याने तटकरेंनी थेट आत्महत्येचाच इशारा दिला. तटकरेंच्या वक्तव्यावर सभागृह अवाक् झाले. गोंधळामुळे परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

प्रश्नोत्तरांच्या तासानंतर सभागृहात मराठी भाषा समितीचा अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर तटकरेंनी भूगोलाचे पुस्तक दाखवत महाराष्ट्राचे गुजरातीकरण कधी केले, असा सवाल केला. त्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केल्याने कामकाज ३५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. सभागृह सुरू होताच विरोधकांनी पुन्हा गुजराती पानांचा मुद्दा उपस्थित केला. ‘असे काहीही घडलेले नाही. पुस्तकात गुजरातीची पाने जोडलेली नाहीत. ही बायंडिंग मिस्टेक असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. तरीही विरोधक आक्रमक झाल्याने पाटील यांनी ‘तुम्हीच जाेडून आणली ही पाने’, असा आरोप केला. त्यावर ‘हे मी छापून आणले हे तुम्ही सिद्ध केले तर इथेच विष घेऊन आत्महत्या करीन’, असा इशारा तटकरेंनी दिला.

एकाच छापखान्यात अनेक भाषांची पुस्तके छापतात. जूनमध्ये हे पुस्तक बाहेर आले. सर्वच पुस्तके गुजरातीत छापली असती तर तटकरेंंनी अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात मुद्दा मांडला असता, असे पाटील म्हणाले. सरकारने इतर ठिकाणची पुस्तके तपासून घ्यावीत, असा सल्ला नीलम गोऱ्हेंनी दिला.