तरुणावर चाकूने वार करुन लुटले; आरोपी निघाले टोमॅटो विक्रेते

167

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळ एका तरुणावर चाकूने वार करुन लुटण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना शनिवारी (दि.२८) पहाटे पाचच्या सुमारास घडली.

सागर सुरेश हिवरकर असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. घाटकोपर पोलिसांनी याप्रकरणी

सलमान ताहीर शहा आणि समीर खलील अहमद सिद्धीकी या दोघांना अटक केली आहे. हे दोघेही टोमॅटो विक्रेते आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास सागर घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या खोत लेनमधून पायी जात होता. यावेळी अंधाराचा फायदा घेत सलमान आणि समीर या दोघांनी  सागरवर चाकूने वार करुन त्याच्या जवळील बॅग, मोबाईल आणि पाकीट काढून घेऊन फरार झाले. या घटनेमध्ये सागर गंभीर जखमी झाला. सध्या सागरवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी सलमान आणि समीर या दोघांना अटक केली आहे. त्याची चौकशी केली असता दोघेही खोत लेनमध्येच टोमॅटो विक्री करत असल्याचे समोर आले आहे. घाटकोपर पोलिस अधिक तपास करत आहेत.