तरुणाला मारहाण केल्याने स्वयंघोषित भाई विरोधात गुन्हा दाखल

375

चाकण, दि. १३ (पीसीबी) – रस्त्याने पायी चालत जाणा-या तरुणाला कारचा कट मारून पुन्हा त्याच तरुणाला मारहाण केली. तसेच ‘मी चाकणचा भाई आहे. मला सगळे घाबरतात’ असे म्हणत धमकी दिली. ही घटना बुधवारी (दि. 11) रात्री साडेनऊ वाजता आंबेठाण चौक ते तळेगाव चौक या दरम्यानच्या मार्गावर घडली.

प्रिन्स ठोकळ आणि त्याचे पाच ते सहा साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शुभम सर्जेराव जोगदंड (वय 19, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पायी चालत एका टपरीवर पान खाण्यासाठी जात होते. त्यावेळी एका कारमधून आरोपी जात होते. आरोपींनी त्यांच्या कारने फिर्यादी यांना कट मारला. त्यामुळे फिर्यादी कारकडे पाहू लागले. कार काही अंतर पुढे जाऊन थांबली आणि त्यातून आरोपी उतरले.

त्यातील एकाने फिर्यादी यांच्या शर्टची कॉलर पकडली. ‘मला प्रिन्स ठोकळ म्हणतात. मी चाकणचा भाई आहे. मला सगळे घाबरतात. तुझी माझ्याकडे पाहण्याची हिम्मत कशी झाली’ असे म्हणून फिर्यादी यांना मारहाण केली. ‘चाकू तलवार काढा रे याला आज मारू’ असे म्हणून आरोपींनी दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.