तरुणाच्या डोक्याला पिस्तुल लावून 12 जणांनी मिळून लोखंडी रॉडने तरुणाला केली मारहाण

119

पिंपरी, दि.०७ (पीसीबी) : जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाच्या डोक्याला पिस्तुल लावून 12 जणांनी मिळून लोखंडी रॉडने तरुणाला मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 5) रात्री तळेगाव-चाकण रोडवर तळेगाव दाभाडे येथे घडली. अमित अरुण म्हाळसकर (वय 27, रा. म्हाळसकरवाडी, तळेगाव दाभाडे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मंदार यादव, मयूर भोकरे, मंगेश जाधव, शुभम भोसले, ऋषीकेश आरटे, अमर चव्हाण, गोपी धोत्रे, वैभव विटे, रितेश शुक्ला आणि अन्य दोन ते तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मंदार यादव, योगेश जाधव, रितेश शुक्ला या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून ‘आता याला सोडायचे नाही’ असे म्हणत आरोपी शुक्रवारी रात्री काठ्या आणि लोखंडी रॉड घेऊन आले. आरोपी मयूर भोकरे याने त्याच्या कमरेला असलेला पिस्टल काढून फिर्यादी अमित यांच्या डोक्यास लावला. त्यानंतर तीन आरोपींनी अमित यांना लोखंडी रोडने बेदम मारहाण केली. यात अमित गंभीर जखमी झाले. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.