तरुणाचे अपहरण करून बॅंकेतील पैसे घेतले काढून

241

पुणे, दि. ३ (पीसीबी) – एका तरुणाचे तीन जणांनी मिळून अपहरण केले. तरुणाच्या बॅंक खात्यातील पैसे एटीएममधून जबरदस्तीने काढून घेतले. ही घटना गुरुवारी (दि. 2) रात्री चांदणी चौकाजवळ घडली.

सचिन भाऊसाहेब निंबाळकर (वय 39, रा. माथाळवाडी-भूगाव, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास चांदणी चौकाकडून भूगावच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. ते नाताळवाडी येथे आले असता दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांची दुचाकी अडविली. ‘आमच्या मोबाइलची नुकसान भरपाई दे, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी फिर्यादी निंबाळकर यांना दिली. तसेच त्यांचा मोबाइल व दुचाकीची चावी जबरदस्तीने काढून घेतली.

त्यानंतर आरोपींनी फिर्यादी निंबाळकर यांना दुचाकीवर बसवून कोथरूडच्या दिशेने वारजे माळवाडीपर्यंत नेले. तिथे व्हायोला सोसायटी जवळील एमटीमएमधून फिर्यादी यांच्या खात्यातून एटीएम कार्डद्वारे नऊ हजार रुपये जबरस्तीने काढून घेतले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.