तरुणाची फोनवरून पोलिसांना तक्रार देत असलेल्या तरुणीचा मोबाईल पळवला

62

वाकड, दि. २७ (पीसीबी) – तरुणीच्या कामाच्या ठिकाणी जाऊन तरुणाने आरडाओरडा केला. त्यावेळी तरुणी पोलिसांना फोन करीत असताना आरोपी तरुणाने मोबाईल हिसकावून घेऊन पळून गेला. ही घटना फेब्रुवारी ते 26 सप्टेंबर 2021 या कालावधीत वाकड येथे घडली.

ऋषिकेश गायकवाड (रा. नेरे, ता. मुळशी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने रविवारी (दि. 26) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या तोंड ओळखीचे आहेत. फिर्यादीला वारंवार फोन करून व मेसेज करून आरोपी त्रास देत होता. त्यामुळे फिर्यादीने त्याचा नंबर ब्लॉक केला होता. तरी देखील आरोपी वेगवेगळ्या नंबर वरून मेसेज व फोन करून धमकी देत होता. माझ्याशी मैत्री कर, असे म्हणून आरोपीने फिर्यादीला त्रास दिला.

फिर्यादी तरुणी रविवारी (दि. 26) त्यांच्या कामाच्या ठिकाणी गेली असता आरोपी तेथे आला. त्यावेळी आरोपीने फिर्यादीच्या अंगावर कागदाचे तुकडे फेकले. झाले का तुझ्या मनासारखे असा म्हणून आरोपीने आरडाओरडा केला. त्यामुळे फिर्यादीने पोलिसांना फोन करण्यासाठी फोन काढला असता सात हजार रुपयांचा तो मोबाईल फोन आरोपी घेऊन पळून गेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare