तरुणाई डिप्रेशनमध्ये, आणि आपण ‘स्मार्ट सिटी’च्या बाता ठोकतोय – पार्थ पवार

362

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – शहरी भागातील तरुणाई डिप्रेशनमध्ये जात असताना, आपण स्मार्ट सिटीच्या बाता ठोकतोय, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मुलगा पार्थ पवार यांनी ट्विटरवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. परिणामी अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याने तरुणांच्या विषयासंबंधी आवाज उठवत, राजकारणातील प्रवेशाचे संकेत दिले आहेत.

पोद्दार इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशनने (पीआयई) जानेवारी ते जून २०१८ या काळात मुंबई, बंगळुरु आणि चेन्नईत सर्वेक्षण केले. यातून त्यांनी तरुणाच्या समस्या जाणून घेतल्या. ही बातमी मुंबई मिरर वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. या बातमीची लिंक पार्थ पवार यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन शेअर केली आणि त्यावर आपले मतही व्यक्त केले.

पार्थ पवार यांनी सर्वेक्षणाच्या बातमीची लिंक शेअर करुन, त्यावर आपले मत व्यक्त करताना म्हटले की, “देशातील महत्त्वाच्या शहरांमधील बहुतांश तरुणाई डिप्रेशनमध्ये जात असताना, आपण ‘स्मार्ट सिटी’च्या गोष्टींवर चर्चा कशी काय करु शकतो? आपण भुतानसारख्या देशांकडून शिकले पाहिजे, कारण तिथे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा देशातील नागरिक आनंदी राहण्याला प्राधान्य दिले जाते”, असे त्यांनी म्हटले आहे.