तब्बल 22 नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर

90

ठाणे, दि. २७ (पीसीबी) – गेल्या निवडणुकीत भाजपकडून निवडून आलेले 22 नगरसेवक भाजपला धक्का देत राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. उल्हासनगर पालिकेतील तब्बल 22 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. ओमी कलानी गटाच्या 22 नगरसेवकांनी मंगळवारी कलानी महल येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची भेट घेतली आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने उल्हासनगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी कलानी महल येथे जाऊन पप्पू कलानी यांची भेट घेतली. भाजपपासून दुरावलेल्या ओमी कलानी यांना राष्ट्रवादीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यानंतर आता कलानी गट भाजपला मोठा धक्का देत त्यांचे 22 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

सध्या उल्हासनगर महापालिकेेत भाजपचे एकुण 40 नगरसेवक आहेत. त्यातले 22 नगरसेवक हे जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. जर उल्हासनगर पालिकेतील या 22 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर उल्हासनगरमधील स्थानिक राजकारणात मोठे बदल दिसून येण्याची शक्यता आहे.

उल्हासनगरमध्ये राजकीय वर्चस्व असलेले कलानी कुटुंब आणि राष्ट्रवादीचे चांगले संबंध आहेत. माजी आमदार ज्योती कलानीही विधानसभा निवडणूकीत भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत होत्या. पण शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी दिली. ज्योती कलानींच्या निधनाने राष्ट्रवादीचं नेतृत्व करणारं कलानी कुटुंबात सध्या कोणीच नाही. त्यामुळे या नगरसेवकांच्या पक्षांतराने राजकीय चित्र बदलण्याची शक्यता आहे.

WhatsAppShare