तनुश्री दत्ताला मुंबई महिला काँग्रेसचा पाठिंबा; नाना पाटेकरांना अटक करण्याची मागणी

259

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – अभिनेत्री तनुश्री दत्ताला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील महिला काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. मुंबईतील ओशिवरा पोलिस ठाण्याबाहेर काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन करून ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या अटकेची मागणी केली आहे.

अभिनेते  नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ता हिने  केल्यानंतर नाना पाटेकर यांच्यासह चौघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेस लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे कृत्य करणे, या अन्वये अभिनेता नाना पाटेकर, हॉर्न ओके प्लीज चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश सारंग , कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि निर्माते सामी सिद्दीकी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

तनुश्री दत्ताच्या लेखी तक्रारीची दखल घेत राज्य महिला आयोगाने नाना पाटेकर यांना नोटीस बजावली होती. तनुश्रीच्या तक्रारीत उल्लेख असलेल्या नाना पाटेकरांसोबत गणेश आचार्य, सामी सिद्दीकी, राकेश सारंग यांना आयोगाने नोटीस बजावली आहे.१० दिवसात आपले म्हणणे आयोगाकडे मांडण्याचे आदेश त्यांना दिले आहेत.