तडीपार आरोपीची पोलिसांना धक्काबुक्की; आरोपी अटकेत

107

चिंचवड, दि. ७ (पीसीबी) – पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेला आरोपी कोणतीही परवानगी न घेता शहरात आला. त्यामुळे त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना त्याने धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. ही घटना रविवारी (दि. 6) दुपारी वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड येथे घडली.

वीरेन्द्र उर्फ बेंद्या भोलेनाथ सोनी (वय 22, रा. चिंचवडे कॉलनी, वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिस शिपाई स्वप्नील शेलार यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वीरेंद्र याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच कोणतीही परवानगी न घेता तो शहरात आला. त्यामुळे त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी रविवारी दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास चिंचवडे कॉलनी, वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड येथे पोलीस गेले. पुढील कारवाईसाठी त्याला ताब्यात घेत असताना त्याने पोलिसांना धक्काबुक्की करून हाताने ढकलून खाली जमिनीवर पाडले. याबाबत याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी वीरेंद्र याला अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare